आयुष्य (१)

आयुष्य यावर जितकं बोलावं तितकं कमी आहे. प्रत्येकाचे विचार निराळे असतात. जगण्याचा दृष्टिकोण वेगळा असतो. आजवर कित्येक किस्से सांगताना ऐकले. ते किस्से एेकले की जीवाचं पाणीपाणी होतं. काहीजण आहे त्या आयुष्य बेचिराख करून टाकतात. अस्सो! तुम्ही कधी आयुष्य एखाद्या स्वतंत्र पक्ष्याप्रमाणे जगलात का? नसेल, तर एकदा जगून पहा.

कधी कधी आयुष्यच आपल्याला खूप काही शिकवून जाते. परंतु ते आपल्याला कळतच नाही. तुम्ही म्हणत असाल की कसं काय शिकवतं ? कळत नकळत असे प्रसंग घडतात की आपल्याला त्याचा थांगपत्ताही लागत नाही. रक्षाबंधनच्या दिवसाची गोष्ट आहे.

एक महिला रिक्शातून प्रवास करत होती. ती बहुतेक घाईत होती. भावासाठी काही भेटवस्तू आणि ग्रीटिंग्स घेतलेले. आणि महागड्या दागिने तिने परिधान केलेले. रिक्शावाला तिला तिच्या इच्छित स्थळी सोडतो. ती वस्तूंची चाचपणी न करता तशीच निघून जाते. रिक्शावाला जातो आणि नंतर त्याचे लक्ष पाठच्या सीटवर जाते. तिथे एक दागिना आणि भेटवस्तू असल्याचे त्याला कळते. तो पुन्हा रिक्शा त्याच रस्त्याच्या दिशेने वळवतो. लगेच त्या महिलेला तिच्या वस्तु ताब्यात देतो. त्याचे प्रमाण म्हणून ती त्याला राखी बांधते. म्हणजेच जीवन आपल्याला कोणत्या न कोणत्या रूपात येऊन काहीतरी नवं, चांगलं करण्याची चेतना देते.

कळीसुद्धा उमलते तेव्हा सोबत सुवासिकता घेऊन येते. ती उमलत गेल्यानंतरची अवस्था किती नाजूक आणि सुंदर असते. तिचे पुष्प होईस तोवर तिला किती सोसावे लागते. वारा ,ऊन ,पाऊस यांच्याशी संघर्ष करत ती आपला प्रवास करत असते. आणि आपण काय करतो? क्षणाचाही विलंब न करता ते फूल तोडतो. त्याच्यामागील अर्थ न समजता तो गुन्हा करतो. थोडक्यात म्हणायचं असं की आयुष्य हे केवळ माणसांचच नव्हे तर साऱ्या सृष्टीच देखील असतं.

© प्रियांका रा. वस्त